राजेंद्र दर्डा आणि उत्तमसिंह पवार यांच्यात मनोमिलन, राजकीय क्षेत्रातील लोकांच्या भुवया उंचावल्या

Foto

औरंगाबाद – जिल्ह्यातील एकेकाळचे दोन दिग्गज नेते म्हणजे माजी मंत्री राजेंद्र दर्डा आणि माजी खासदार उत्तमसिंग पवार. या दोन्ही नेत्यांमध्ये मागील काही वर्षांपासून राजकीय वाद निर्माण झाला होता. परंतू आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे दिसले. दर्डा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उत्तमसिंग पवार जातीने हजर राहिल्याने या मनोमिलनावर शिक्कामोर्तब झाले.

...यामुळे आले होते राजकीय वितुष्ट

उत्तमसिंग पवार यांनी २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर औरंगाबाद लोकसभा लढवून खासदार चंद्रकांत खैरे यांना कडवी टक्कर दिली होती. अवघ्या ३३ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यानंतर २०१४ मध्येही त्यांना लोकसभा लढवण्याची इच्छा होती. मात्र तत्कालिन मंत्री राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे राजकीय वजन वापरून पवार यांचे तिकीट कापल्याची चर्चा होती. तेव्हा पासून या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वैमनस्य निर्माण झाले. लोकसभेला तिकिट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या पवारांनी दर्डांना पाडण्यासाठी २०१४ मध्ये विधानसभा निवडणूकही लढवली होती.  

२००९ मधील पराभवासाठीही दर्डांना धरले होते जबाबदार
लोकसभा २००९ मध्ये दर्डां यांनी काम न केल्यामुळेच आपला पराभव झाला असा आरोप पवार यांनी केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये तर उत्तमसिंग पवारांचे तिकिटच कापले गेले आणि त्यामुळे गेल्या ९ वर्षांत दर्डा आणि पवार यांच्यातून विस्तवही जात नव्हता. पवार यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मराठवाडा विकास पक्षाची स्थापना केली आहे. परंतु आता पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी मनोमिलन झाले, त्याची प्रचिती आज दर्डा यांच्या वाढदिवसादिवशी पाहायला मिळाली.
 

राजकीय आकांक्षेच्या पूर्ततेसाठी मनोमिलन
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राजेंद्र दर्डा यांचा पराभव झाला तेव्हापासून ते राजकारणापासून अलिप्त होते. पण आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. राजकारणात पूर्वी असलेल्या राजकीय विरोधकांशी जुळवून नव्याने राजकारणाचा डाव खेळण्याचा प्रयत्न दर्डा आणि उत्तमसिंह पवार हे करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण व्हावी. यासाठीच दर्डा - पवार यांचे मनोमिलन झाले असल्याचेच कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त आज बऱ्याच वर्षानंतर उत्तमसिंह पवार यांनी हजेरी लावली व शुभेच्छा ही दिल्या, त्यामुळे या मनोमिलनावर शिक्कामोर्तब झाले.